देहविक्री व्यवसायाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी । शहरातील देहविक्री व्यवसायाच्या प्रश्‍नाबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनने दिला आहे.

या प्रसंगी फाऊंडेशनचे मौलाना रियाज यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अमळनेर ही संतांची भूमी आहे. इथला इतिहास हा क्रान्तिकारकांचा आहे, या नगरीत जागतिक स्तरावरील धार्मिक स्थळे आहेत. ही भूमी पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते. संत सखाराम महाराजांची समाधी असलेली प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेली भूमी आहे, अमळनेरला शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. असे असून सुद्धा निवळ शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वेश्यावस्ती मुळे शहराचे नाव हे बदनाम होत आहे, यामुळे शहरात गुन्हेगारीचा प्रश्‍न दिवसें दिवस गंभीर होत चाललेला आहे, या वस्तीच्या आजूबाजूला धार्मिक स्थळे आहेत. या वस्तीत येणारे आंबट शौकिन कधी कधी सज्जन नागरिकांच्या घरात घुसल्याचा प्रकार अनेकदा घडलेला आहे. आम्ही अनेकदा पोलीस प्रशासन सह जळगाव जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदने दिले आहे, अनेकदा पोलीस प्रशासनाकडून या वस्तीवर कार्यवाही सुद्धा करण्यात आल्या आहेत. तरीही कायद्याच्या पळवाटा शोधून स्थानिक काही राजकीय लोकांच्या मदतीने सदर अनैतिक व्यवसाय सर्रास सुरु आहे. यामुळे मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन हे या वस्ती विरोधात मोठे आंदोलन उभारणार आहे, वेळ पडल्यास जेलभरो सुद्धा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महिलांना शहराबाहेरील जागेत त्यांचे पुनर्वसन करा जेणे करून शहरातील कायदा सुव्यस्था चांगली राहील, अश्या प्रकारच्या मागण्या या वेळी करण्यात आल्या.

Add Comment

Protected Content