भुसावळच्या हद्दीत येण्यास फेकरीकरांचा विरोध- सोनवणे ( व्हिडीओ )

भुसावळ प्रतिनिधी । फेकरी ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्याला आणि त्यांना प्राथमिक सुविधा पुरवण्याला फेकरीची ग्रामपंचायत सक्षम आहे. त्यामुळे आमचा भुसावळ नगर पालिकेत समावेश करण्याला विरोध आहे. अशी रोख-ठोक भूमिका फेकरीचे माजी सरपंच तथा काँग्रेस नेते प्रभाकर सोनवणे यांनी आज जाहीर केली.

आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रभाकर सोनवणेे म्हणाले की, मुळात भुसावळ न.पा. आपल्या नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात अपयशी ठरली आहे. असे असताना केवळ आपले उत्पन्न वाढवण्यासाठी ते आमचा नगर पालिकेत समावेश करीत असल्याने आमचा त्याला विरोध आहे. तसेच आम्ही भुसावळ न.पा. हद्दीपासून सहा कि.मी. दूर आहोत, त्यामुळे आमच्याकडे बघण्यापेक्षा प्रशासनाने जवळच्या गावांकडे बघावे, असेही सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रभाकर सोनवणे पुढे म्हणाले की, दीपनगर येथे ६६० मेगावॉटचे विद्युत केंद्र मंजूर आहे. तिथे जमीन, पाणी, कोळसा सगळं उपलब्ध आहे. तरीही त्याचे काम मंदगतीने चालले आहे. ज्यांनी या प्रकल्पाला जमिनी दिल्या, त्यांच्या मुलांना प्रशिक्षण देऊनही त्यांना नोकरी देण्यात आलेली नाही. तसेच कुठल्याही प्रकल्पात स्थानिक लोकांना नोकरीत प्राधान्य देण्यात येत असते, मात्र या प्रकल्पात बाहेरून कामगार आणले जात असून स्थानिकांना डावलले जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. असे केल्याने स्थानिक लोकांवर अन्याय होत आहे. दरम्यान वीज टंचाई दूर करण्यासाठी नवे विद्युत केंद्र पूर्ण होण्यापूर्वी सध्या बंद असलेले तीन क्रमांकाचे पॉवर स्टेशन लवकरात लवकर सुरु करून वीज टंचाई दूर करावी आणि त्यातूनही स्थानिकांना रोजगार मिळवून द्यावा, असे आवाहनही सोनवणे यांनी यावेळी केले.

पहा– प्रभाकर सोनवणे यांची हद्दवाढीबाबतची भूमिका.

Add Comment

Protected Content