महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांचा प्रवास अनुभवण्याची संधी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा परिचय करून देण्यासाठी एक विशेष ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ रेल्वे यात्रा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत ही विशेष यात्रा ९ जून २०२५ पासून सुरू होत असून, ५ रात्री आणि ६ दिवसांच्या या प्रवासात महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या विशेष प्रवासाचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटकांना केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा अनुभव
या ५ दिवसांच्या विशेष प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जातील, तसेच इतिहासावर आधारित कार्यक्रमही आयोजित केले जातील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उद्देश ‘भारत गौरव ट्रेन’च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देणे हा आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. या यात्रेदरम्यान गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर पर्यटकांना आवश्यक सर्व सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

प्रवासाचा तपशील आणि प्रमुख स्थळे
सहल तपशील:
नांव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
शुभारंभ दिनांक: ९ जून २०२५
कालावधी: ५ रात्री / ६ दिवसांची यात्रा
प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक: दादर, ठाणे

यात्रेचा प्रवासमार्ग:
मुंबई (सीएसएमटी) – रायगड – पुणे (लाल महाल, कसबा गणपती, शिवसृष्टी) – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर) – पन्हाळा – मुंबई.

प्रमुख ऐतिहासिक स्थळे:
रायगड किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि राज्याभिषेकाचे स्थान.
लाल महाल, पुणे: शिवाजी महाराजांचे बालपण गेलेले ठिकाण.
कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे: पुण्याचे ग्रामदैवत आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला: छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला: अफझलखानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर: महालक्ष्मी मंदिर.
पन्हाळा किल्ला: बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

पॅकेज आणि सुविधा
या सहलीसाठी इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3A), सुपीरियर (2A) अशा विविध प्रकारची पॅकेजेस उपलब्ध आहेत. पॅकेजेसमध्ये भारत गौरव ट्रेनने प्रवास, वातानुकूलित/विनावातानुकूलित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक, गाईड, ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन, प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी) आणि सुरक्षा व्यवस्था यांचा समावेश आहे. साहसी खेळ, बोटिंग किंवा इतर कोणताही वैयक्तिक खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट नाही. अधिक माहिती आणि आरक्षणासाठी, पर्यटक IRCTC च्या www.irctctourism.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.