जामनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सूनसगाव येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसात वीज कोसळून एक दुर्दैवी घटना घडली. या घटनेत गावातील शेतकरी गोपाल इंधाटे यांच्या दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन म्हशी जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
नेमकी घटना
सोमवारी रात्री जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. याच दरम्यान सूनसगाव येथे अचानक वीज कोसळली. ही वीज गोपाल इंधाटे यांच्या गोठ्यात असलेल्या म्हशींवर पडली. विज कोसळल्याने त्यांच्या मालकीच्या दोन म्हशींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने, इतर दोन म्हशी जखमी अवस्थेत वाचल्या, मात्र त्यांनाही मोठा धक्का बसला आहे.
पंचनामा पूर्ण, मदतीची मागणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किनगे आणि डॉ. अमोल वराडे यांनी घटनास्थळी येऊन मृत म्हशींचा पंचनामा केला. त्यांच्यासोबत पोलीस पाटील समाधान महाजन आणि तलाठी क्षीरसागर यांनीही नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तयार केला.
या दुर्घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळण्याची मागणी सूनसगावातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीमुळे इंधाटे कुटुंबावर मोठे संकट आले आहे.