भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या फक्त अफवा : एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसून या सर्व अफवा असल्याची अधिकृत भूमिका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आ. एकनाथराव खडसे यांनी जाहीर केली आहे.

आमदार एकनाथराव खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असून काल राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलतांना याचे सूतोवाच केले होते. एकनाथ खडसे हे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करत असल्याची माहिती त्यांनी दिली होती. यामुळे नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाची चर्चा वेगाने सुरू होती.

दरम्यान, या सर्व चर्चांबाबत आमदार एकनाथराव खडसे यांनी समाजमाध्यमातून भाष्य केले आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या अफवा माझ्याबाबत संभ्रम निर्माण व्हाव्या म्हणून पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करावे. असे त्यांनी नमूद केले आहे.

या माध्यमातून आमदार एकनाथराव खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Protected Content