‘सारथी’ पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन

पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दीपस्तंभ प्रकाशनाचे प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित स्पर्धा परीक्षा ‘सारथी’ या पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन “राष्ट्रीय युवा” दिनानिमित्ताने करण्यात आले.

तर ऑफलाईन पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी स्पर्धा परीक्षा सारथी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या कार्यक्रमास राज्यातील तंत्रज्ञान सहायता केंद्राचे प्रमुख व करिअर कट्टा चे समन्वयक यशवंत शितोळे, राज्यातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षण तज्ञ व राज्यभरातील ५ हजार विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.

बदललेल्या परिस्थितीमध्ये करिअर कट्टा आणि युवक या विषयी जाणीव व जागृती कार्यशाळा या विषयावर उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले. उदय सामंत यांनी स्पर्धापरीक्षा सारथी या पुस्तकाच्या माध्यमातून राज्यातील मुलांना विविध स्पर्धा परीक्षांची ओळख होऊन महाराष्ट्रातील मुलांना करिअर निवडण्यासाठी हे पुस्तक अत्यंत मोलाची भूमिका बजावेल. प्रा. राजेंद्र चिंचोले हे राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे उदय सामंत यांनी कौतुक केले. करिअर कट्टाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांना प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी सातत्याने मार्गदर्शन करण्याचे आव्हान केले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक आरसा आहे. राज्यातील प्रत्येक वाचनालयात संग्रही असावे असे हे पुस्तक असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. या पुस्तकाचा वापर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने केला पाहिजे असे प्रतिपादन उदय सामंत यांनी केले.

आमदार किशोर पाटील यांनी स्पर्धा परीक्षा सारथी हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या करिअरला श्रीकृष्ण रुपी सारथी असल्याचे व विद्यार्थ्यांना क्षमता व आवडीनुसार करिअर निवड करण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. केंद्रीय व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची सखोल माहिती असणारे हे पहिलेच पुस्तक आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण तज्ञ, पालक यांना अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

पाचोरा येथील प्रा. राजेंद्र चिंचोले हे २५ वर्षापासून स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतात. तालुक्यातील ग्रामविकास कनिष्ठ विद्यालय पिंपळगाव (हरेश्वर) येथे भौतिक शास्त्र विषयाचे अध्यापन करतात. ग्रामीण भागातील पहिले मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ज्ञानप्रबोधिनी मंडळ पाचोरा या ठिकाणी त्यांनी सुरू केले. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक व करिअर कौन्सिलर म्हणून ते काम पाहतात. स्पर्धा परीक्षांवर ३०० पेक्षा जास्त व्याख्याने त्यांनी दिली असून प्रा. राजेंद्र चिंचोले यांच्या मार्गदर्शनाने वर्ग – १, वर्ग – २ व वर्ग – ३ पदी ४०० पेक्षा जास्त विद्यार्थी कार्यरत आहे. विविध वृत्तपत्रांमधून राज्यभर लेखमालिकेच्या माध्यमातून त्यांचे आतापर्यंत ५५० पेक्षा जास्त  स्पर्धा परीक्षांवरील लेख प्रकाशित झाले आहे. इयत्ता ११ वी व १२ वी च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात भौतिकशास्त्र विषयाचे लेखन मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले असून राज्य स्तरावर व विभाग स्तरावर भौतिक शास्त्र विषयांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून ते काम पाहतात. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जळगाव उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी केले.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content