जळगावात मेडीकल दुकानदाराची ५० हजाराची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील राधाकिसन वाडी येथील मेडीकल दुकानदाराला बीएसएनएल मोबाईल नंबरचे केवायसी करून घेण्याच्या नावाखाली सुमारे ५० हजार रूपयांचा चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर वामन कोल्हे (वय-६७) रा. हिरापन्ना आपारमेंट, सिव्हिल हॉस्पिटल जवळ, जळगाव हे मेडिकल स्टोअर करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रभाकर कोल्हे सोमवारी १३ डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मेडिकल दुकानावर असताना त्यांना एका अनोळखी नंबर वरून मेसेज आला. त्यात त्यांना बीएसएनएल कंपनीचा मोबाईलचे केवायसी करून घ्या यासाठी दुसऱ्या क्रमांकावर संपर्क साधा असे सांगितले. त्यानुसार कोल्हे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे माहिती भरत गेले. त्यानंतर त्यांना एका ॲप डाऊनलोड करण्यास सांगून ओटीपी मागितला. त्यानंतर त्यांना केवायसीच्या नावाखाली १० रुपयाचे चलन भरण्यास सांगितले. याबाबत त्यांनी त्यांच्या एका बँकेच्या डेबिट कार्डच्या माध्यमातून माहिती भरली. परंतु त्यांच्या खात्यातून १० रुपये वर्ग न होता २४ हजार ५००, २० हजार आणि ५ हजार असे एकुण ४९ हजार ५०० रूपयांचे तीन व्यवहार झाल्याचे समोर आले. यासंदर्भात प्रभाकर कोल्हे यांनी तातडीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदुरकर करीत आहे.

 

Protected Content