फ्रॅन्चाईसी देत असल्याचे सांगून एकाची ५ लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । कंपनीची फ्रॅन्चाईसी देत असल्याचे भासवून पोराळा येथील एकाला ५ लाख रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पारोळा शहरातील तलाव गल्लीत राहणारे संजय मोहनलाला शर्मा हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते खासगी व्यवसाय करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. जुलै २०२० ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान त्यांना एका नंबरवरून फोन आला. साईराम बालाजी पाटील आणि परमेश बालाजी पाटील असे नाव सांगून डेनिम हब लाईफ स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून बोलत असल्याची बतावणी केली. आपल्याला याचा फ्रॅन्चायसी देतो असे सांगून दोघांनी वेगवेगळ्या कारणासाठी संजय शर्मा यांच्याकडून ५ लाख रूपये ऑनलाईन मागावून घेतले. पैसे देवून फ्रॅन्चायसी मिळाली नसल्याने शर्मा यांनी पैश्यांची मागणी केली. दोन्ही व्यक्तींकडून कुठल्याही रकमेचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय शर्मा यांनी जळगाव येथील सायबर पोलीसात धाव घेतली. संजय शर्मा यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Protected Content