वाळू तस्करी करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध वाळू वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिखली खुर्द गावाजवळच्या एका शेतात अवैध वाळू उपसा करणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चिखली खुर्द येथील शेताजवळ यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील निवासी असलेल्या विनोद राजू कोळी ( वय ३६) हा चालक अवैध वाळू आपल्याकडील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाहून नेत होता.

दरम्यान, तो वेगाने ट्रॅक्टर चालवत असतांना अचानक ट्रॉली उलटली. यात ट्रॉलीमध्ये बसलेला विष्णू टिलकचंद सोनवणे ( वय ४१, रा. भालशिव, ता. यावल) हा इसम याखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला. या संदर्भात, चिखली खुर्द येथील पोलीस पाटील रवींद्र बाबुराव सावळे यांनी फैजपूर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचा मालक काशिनाथ नथ्थू कोळी ( रा. भालशिव, ता. यावल) आणि चालक विनोद राजू कोळी यांच्या विरोधात भादंवि कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८, ३७९, १०९ तसेच महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील अधिनियम ४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्‍हाटे व उमेश चौधरी हे करीत आहेत.

Protected Content