Home क्राईम के-हाळा येथे हाणामारीत एकाचा मृत्यू ; घटनेने खळबळ

के-हाळा येथे हाणामारीत एकाचा मृत्यू ; घटनेने खळबळ

0
24

रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । के-हाळा (ता. रावेर) येथे दोन जणांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमी व्यक्तीला उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, के-हाळा येथील इंदिरा नगर परिसरात राहणारे राजू रवींद्र कपडे आणि रामसिंग चिंधू भिल यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रामसिंग भिल याने राजू कपडे यांच्या मानेवर धारदार वस्तूने वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात राजू कपडे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर नागरिकांनी रामसिंग भिल याला पकडून एका घरात कोंडून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेतील राजू कपडे यांना गावातील नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी राजू कपडे यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. हाणामारीचे नेमके कारण काय होते, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. घटनेतील संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.

या घटनेमुळे के-हाळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. घटनेमागील नेमके कारण आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या वस्तूबाबत पोलिस तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत राजू रवींद्र कपडे यांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रावेर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, खुनामागील कारणाचा शोध घेतला जात आहे.


Protected Content

Play sound