वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरात अद्याप सुसज्ज आणि आधुनिक क्रीडांगण उपलब्ध नसल्याने स्थानिक खेळाडूंना सरावासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वरणगाव शहरासाठी आधुनिक क्रीडांगण मंजूर करण्याची मागणी करण्यात आली असून, लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांची भेट घेऊन सातबारा उताऱ्यांसह क्रीडांगणाचा प्रस्ताव त्यांच्याकडे सुपूर्द केला.
वरणगाव शहरातील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक वर्षांपासून क्रीडांगणाची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. शहरातील मुलांना आणि युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सुसज्ज मैदान, सरावाची सुविधा आणि आवश्यक क्रीडा पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने नगरपरिषदेच्या वतीने क्रीडांगणासाठी उपलब्ध असलेल्या विविध जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावात वरणगाव नगरपरिषद हद्दीतील विविध पर्यायी जागांचा समावेश केला आहे. शहरातील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या भिलेश्वर ट्रस्टच्या जागेसह जुन्या गावातील नगरपरिषदेने आरक्षण टाकलेल्या जागेचा पर्याय प्रस्तावात मांडण्यात आला आहे. तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंडावरही आधुनिक क्रीडांगण उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय पवन नगरजवळील सुमारे १३ एकर जागा अथवा सिद्धेश्वर नगरजवळील नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंडावर आधुनिक क्रीडांगण उभारता येऊ शकते, असेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. या सर्व जागांबाबतचे सातबारा उतारे प्रस्तावासोबत सादर करण्यात आले आहेत. नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांची भेट घेऊन प्रस्तावातील प्रत्येक जागेची माहिती त्यांना समजावून सांगितली. संबंधित जागांचे क्षेत्रफळ, मालकी हक्क आणि क्रीडांगणासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या जागांबाबत त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. वरणगाव शहराच्या क्रीडा विकासासाठी आधुनिक क्रीडांगण मंजूर व्हावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.
आधुनिक क्रीडांगण उपलब्ध झाल्यास वरणगाव शहरातील विविध खेळांच्या खेळाडूंना सरावासाठी हक्काची जागा मिळणार असून, स्थानिक पातळीवरून गुणवंत खेळाडू घडण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या प्रस्तावाकडे शहरातील क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंचे लक्ष लागले आहे. या भेटीवेळी नगरसेवक नाना चौधरी, शामराव धनगर, शहराध्यक्ष सुनील माळी, आकाश निमकर, बळीराम दादा सोनवणे, क्रीडा समितीचे अजमल भाई खान, फझल शेख, राहुल देशमुख आणि भोजराज पालवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



