जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । के.सी.ई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र आणि ओजस्विनी कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी चला किल्ला बनवूया” या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात करण्यात आले होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या स्थापत्य कलेच्या रचनांबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. ओजस्विनी कला महाविद्यालयातील शिल्पकार देवा सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मातीचा किल्ला बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले. किल्ला बनवत असताना मातीचा प्रकार, बुरुज, तटबंदी, किल्ल्याचा मुख्य दरवाजा कमान यांची प्रात्यक्षिकातून माहिती दिली.
शालेय विद्यार्थ्यांकडून कार्यशाळेत तोफ -रणगाडे, मावळे इ.ची प्रत्यक्ष सुबक निर्मिती करून घेण्यात आली. दिवाळीच्या सुट्टीत सहभागी विद्यार्थ्यांनी घरी किल्ला बनवण्याचे आश्वासन दिले असून ,सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यशाळेस केसीई सोसायटीचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, कान्ह ललित कला केंद्राचे संचालक प्रा.प्रसाद देसाई, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे, ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनास प्रा.पियुष बडगुजर, प्रा. दिगंबर शिरसाळे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ,प्रा.देवेंद्र गुरव, शिवम चौधरी, कुणाल जाधव, भूषण भोळे,राजेंद्र सरोदे आदींचे मौलिक सहकार्य प्राप्त झाले.