खळबळजनक : जिल्हा कारागृहातील लाचखोर सुभेदारसह दोन महिला पोलीस एसीबीच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कारागृहात असलेल्या संशयित आरोपीला भेटण्यासाठी २ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या सुभेदारसह दोन महिला पोलीसांना धुळे येथील लाचलुचपत विभागच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सुभेदार भीमा उखर्डू भिल, महिला पोलीस पूजा सोपान सोनवणे व हेमलता गैबू पाटील असे अटक केलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला ह्या पहूर येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा हा एका गंभीर गुन्ह्यात जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान मुलाला भेटण्यासाठी आलेल्या तक्रारदार महिला यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी करत भेटून देण्याचे सांगितले जात होते. याच अनुषंगाने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहात आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भीमा भिल, महिला पोलीस पूजा सोनवणे हेमलता पाटील यांच्यासह इतर जण होते. त्यावेळी मुलाला भेटण्यासाठी महिलेकडून दोन हजारांची मागणी केली होती.

दरम्यान तक्रारदार महिला यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पैसे देवून शकत नव्हते. त्यांनी थेट धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. त्यानुसार पथकाने बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सापळा रचला. त्यावेळी ड्युटीवर असलेले महिला कारागृह पोलीस पूजा सोनवणे, हेमलता पाटील यांनी सुभेदार भीमा उखर्डू बिल यांच्या सांगण्यावरून तक्रारदार महिलेकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी धुळे पथकाने रंगेहात पकडले. पोलीसांनी तिघांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली आहे.

Protected Content