आता जिल्ह्यातील बारमध्ये रात्री नऊपर्यंत ‘बसण्याची’ सुविधा !

जळगाव प्रतिनिधी । हॉटेल व बार खुलले तरी वेळीच्या मर्यादेचा अडसर ठरल्याने शौकिनांची कुचंबणा होत होती. या पार्श्‍वभूमिवर, आता जिल्ह्यातील हॉटेल व बार हे रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील असे निर्देश जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

जिल्ह्यात ५ ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली होती. त्यानुसार हॉटेल्स, बार सुरूही झाले. मात्र, त्याची वेळ ठरवून देण्यात आलेली नव्हती. यानंतर राज्याच्या पर्यटन विभागाने वेळ ठरवून दिल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या सेवा सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार ऑक्सिजन पातळी ९५ पेक्षा कमी, तापमान ३८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व ताप असलेल्या रुग्णांना प्रवेश देण्यात येणार नाही. त्याचबरोबर स्वच्छता व सुरक्षिततेबाबत नियमावली ठरवून दिली आहे. हॉटेलमधील सर्व कामगार, कर्मचार्‍यांनाही मास्क लावणे बंधनकारक असेल. ग्राहकांना हॅन्ड सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे. ग्राहकाकडून डिजिटल पेमेंट घ्यावे. रोख रक्कम घेताना आवश्यक खबरदारी घेणे, कॅश काउंटरच्या ठिकाणी फ्लेक्झिग्लास स्क्रीनचा वापर, शक्य झाल्यास स्वतंत्र प्रवेश व निर्गमनाची व्यवस्था, डिस्पोजेबल पेपर नॅपकीनचा वापर, दोन टेबलमध्ये १ मीटरचे अंतर ठेवावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

यासोबत प्रवेशद्वाराजवळ प्रवेश करणार्‍या प्रत्येक ग्राहकाचे थर्मल गनच्या साहाय्याने तापमान मोजण्यात येईल. प्रवेश करणार्‍या ग्राहकाचे पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने ऑक्सिजन पातळी मोजण्यात येईल. त्यानंतर ग्राहकाला सॅनिटायझर देण्यात यावे असे देखील निर्देश दिलेले आहेत. महत्वाचे म्हणजे सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व बार आस्थापनांनी कामगार, कर्मचार्‍यांची कोविड चाचणी करण्याचेही सांगण्यात आले आहे. या अटींचे पालन केल्यानंतर हॉटेल्सला रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.