राजकारण्यांच्या गुगलीवर गुप्तेश्‍वर बोल्ड; पत्ता कट झाल्याने तिळपापड !

पाटणा वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उतावीळपणे पोलीस महासंचालकपदाचा राजीनामा देणारे गुप्तेश्‍वर पांडे यांना जेडीयूने तिकिट नाकारल्याने त्यांची चांगलीच गोची झाली आहे.

बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. पांडे यांनी नुकतंच डीजीपी पदाचा राजीनामा देत जेडीयूमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते बक्सरमधून विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र जेडीयूने आपल्या कोट्यातील सर्व ११५ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. या यादीमध्ये गुप्तेश्‍वर पांडे यांचं नाव नाही. बक्सरची जागा युतीमध्ये भाजपकडे गेली असून भाजपकडून या जागेवर परशुराम चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळाली आहे.

यामुळे गुप्तेश्‍वर पांडे यांना जोरदार धक्का बसला आहे. परिणामी आता यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. आपले आयुष्य बिहारच्या जनतेसाठी अर्पण केल्याची पुस्ती त्यांनी जोडली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.