ट्रॅक्टर दुरूस्तीच्या कारणावरून गॅरेज मेकॅनिकला मारहाण

तालुका पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणा गावात ट्रॅक्टर दुरूस्ती करून दिले नाही या रागातून एकाला गॅरेजवरील मेकॅनिक तरूणाला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आरीफ मलीक शरीफ मलीक (वय-३०) रा. आव्हाणा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. आरीफचे गावातच असलेल्या गॅरेजवर मॅकनिकचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजात त्याच्या गॅरेजवर नितीन पाटील उर्फ पपई रा. आव्हाणा ता.जि.जळगाव हा तिथे आला. त्याचे रस्त्यावर बंद पडलेले ट्रॅक्टर दुरूस्ती करण्याचे आरीफ याला सांगितले. त्यावर मला दुसरे काम सुरू असल्याने तुझे काम करू शकत नाही असे आरीफने सांगितले. याचा राग आल्याने नितीन पाटील याने आरिफला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आरिफ मलीक याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नितीन पाटील उर्फ पपई याच्या विरोधात दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Protected Content