जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कविवर्य व गझलसम्राट सुरेश भट यांची गझलेची बाराखडी ही अजूनही समस्त नव्या व जुन्या गझलकारांसाठी एखाद्या दीपस्तंभासारखे कार्य करीत आहे. गझल हा एक सर्वांगसुंदर असा काव्यप्रकार आहे. मराठीतही आता हा प्रकार लोकप्रिय होतोय. अरबी, पारशी, उर्दू, हिंदी आणि मराठी असा जरी मराठी गझलचा प्रवास झाला असला तरी अस्सल मराठमोळेपणा मराठी गझलेने जपला आहे, असे प्रतिपादन गझलकार डॉ. शिवाजी काळे (राशीन जि. अहमदनगर) यांनी जळगावात एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे उदघाटक म्हणून केले.
महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था, खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे जळगाव येथे रविवार दि. १० मार्च रोजी खान्देश विभागीय एक दिवसीय मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते. मंचावर जळगाव येथील सुप्रसिद्ध गझलकार डॉ. ज्ञानेश पाटील हे संमेलनाध्यक्ष होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वागताध्यक्ष म्हणून गझलकार निलेश कवडे (अकोला) हे तर संदीप वाकोडे (मूर्तिजापूर), उर्मिला बांदिवडेकर, सच्चीदानंद जाधव, युवराज माळी हे उपस्थित होते.
सुरुवातीला दीपप्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले, देवी सरस्वती, गझलसम्राट सुरेश भट यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी माल्यार्पण केले. गझल मंथन साहित्य संस्था राज्यात सदैव गझलेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करीत आहे. नवोदित गझलकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी विभागीय स्तरावर गझल संमेलन आयोजित केले जात आहेत, अशी माहिती प्रास्तविकेतून संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे यांनी दिली.
संमेलनात जळगावचे कवी ॲड. मुकुंदराव भाऊराव जाधव यांचा “फुलला सुगंध प्रेमाचा..” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रेम या एकाच विषयावर आधारित विविध ९५ कवितांचा समावेश या काव्यसंग्रहात आहे. या संग्रहाला प्रसिद्ध गझलकार व साहित्यिका उर्मिला बांदिवडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. संमेलनात त्यांनी याविषयी माहिती सांगितली. शिरपूर येथील अनिता खैरनार यांना “गझल यात्री सन्मान” पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर उदघाटक डॉ. शिवाजी काळे यांनी उदघाटनपर मनोगत व्यक्त केले. तसेच, संदीप वाकोडे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाध्यक्ष ज्ञानेश पाटील यांनी, गझल हा कष्टसाध्य काव्यप्रकार आहे. गझल शिकण्यासाठी मार्गदर्शन आणि मार्गदर्शकांची आवश्यकता असते असं सांगून, कालानुरूप आधुनिक गझलेचा लोकाभिमुख लहेजा आणि बदललेला आशयविषय याविषयी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन काशिनाथ गवळी यांनी करून आभार मानले. सहभागी गझलकारांना आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, खान्देश विभाग अध्यक्ष काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष अॅड. मुकुंदराव जाधव, बाळासाहेब गिरी, यशश्री रहाळकर, अतुल देशपांडे यांचेसह जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, शिवाजी साळुंखे, मंजुषा पाठक, सुदाम महाजन, डॉ. शकुंतला चव्हाण यांच्यासह खान्देश विभागीय कार्यकारिणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे परिश्रम घेण्यात आले.
दुपारच्या ६ सत्रांत रंगले मुशायरे
संमेलनाच्या उदघाटनानंतर विविध सहा सत्रांत मुशायरा घेण्यात आला. गझलकार डॉ. कैलास गायकवाड, विजय वडवेराव, रावसाहेब कुवर, विजय पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, वीरेंद्र बेडसे या नामांकित गझलकारांनी विविध सत्रात संपन्न होणाऱ्या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद भूषविले. गझलकार राज शेळके, संदीप पटेल, डॉ. कुणाल पवार, छाया सोनवणे, आशा साळुंके, ज्योती वाघ यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन केले. या संमेलनात उत्तर महाराष्ट्रातील सुमारे १०० पेक्षा अधिक गझलकार सहभागी झाले होते. तुम्ही चांगली गझल लिहिली तर आम्ही तिला संगीतबद्ध करून ती रसिकांपुढे घेऊन येऊ. तुमच्या उत्तमोत्तम गझला रसिकांच्या ओठांवर रूळतील. आपल्याला जे अभिव्यक्त व्हायचे आहे, ते आतून स्फुरले पाहिजे. मात्रा नुसार शब्द लिहिता आले पाहिजे. त्यानुसार ओळ बनवता आली पाहिजे. मग गझल बनायचा प्रवास सुरू होतो, असे मार्गदर्शन विविध सत्रांत अध्यक्षांनी व्यक्त केले.