अमळनेरातील विकासासाठी १ कोटीच्या कामांना मंजूरी

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आ. अनिल पाटील यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचे काम जवळपास निश्चित केले असून आणखी एक कोटींच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 2021-22 साठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत या 1 कोटीच्या कामांना त्यांनी मंजुरी मिळवली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. यातून अमळनेर मतदारसंघात ग्रामिण भागातील सात गावांसह शहरात एका प्रभागात रस्ते काँक्रीटिकरण, सामाजिक सभागृह, सभामंडप, संरक्षण भिंत, चौक सुशिभिकरण यासारखी कामे मार्गी लागणार आहेत.

याठिकाणी होणार विकासकामे

जानवे, ता. अमळनेर येथे सभामंडप बांधकाम करणे(15 लक्ष), तळवाडे, ता. अमळनेर येथे संरक्षण भिंत बांधणे (10 लक्ष), शेळाव बु. ता. पारोळा येथे चौक सुशोभिकरण करणे (10 लक्ष), शेळावे बु. ता. पारोळा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे (10 लक्ष), अमळनेर न.प. हद्दीत प्रभाग क्र.3 मध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे (10 लक्ष), अंबापिप्री, ता. पारोळा येथे सभामंडप बांधकाम करणे(20 लक्ष), दळवेल, ता. पारोळा येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे/पेव्हर ब्लॉक करणे (15 लक्ष), भिलाली, ता. अमळनेर येथे रस्ता कॉक्रीटीकरण करणे/पेव्हर ब्लॉक करणे (10 लक्ष) विकासकामे होणार आहेत.

सदर कामांच्या मंजुरी बद्दल आमदार अनिल पाटील  यांनी मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना अजित पवार,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना धनंजय मुंडे,जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील आदींचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान मतदारसंघात निधीचा वाढता स्त्रोत पाहता मोठया प्रमाणात विकासकामे होत असल्याने आमदार पाटील यांचे जनतेतून विशेष कौतुक होत आहे.

Protected Content