जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका तरूणावर चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता जोशी कॉलनीत घडली होती. याप्रकरणी शनिवारी ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका संशयिताला अटक करण्यात आली असून इतर तीन जण फरार झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सिंधी कॉलनीजवळील नगरात अविनाश किशोर जोशी वय २५ हा तरुण वास्तव्यास आहे. त्यांच्या घराजवळील विजय उर्फ भूरा जोशी याने अविनाश जोशी याच्याकडून २० हजार रुपये उसनवारीने घेतले होते. शुक्रवार २ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अविनाश उर्फ भूरा जोशी हा घरासमोर उभा असतांना, अविनाश याने त्याच्याकडे उसनवारीच्या पैशांची मागणी केली. यावेळी भुरा जोशी हा अविनाश याला शिवीगाळ करु लागला. याचवेळी भुरा जोशी याचा भाऊ सचिन जोशी, त्याचा मुलगा हर्षल व पुष्पा जोशी त्याठिकाणी आले. ते देखील अविनाश सोबत वाद घालू लागले, या वादात हर्षल जोशी याने त्याच्याजवळील धारदार चाकूने अविनाशच्या पोटावर आणि छातीवर वार केले. त्यानंतर सर्वजण तेथून पसार झाले. परिसरातील काही तरुणांनी जखमी अवस्थेत असलेल्या अविनाशला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी त्याने दिलेल्या जबावारुन एमआयडीसी पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे हे करीत आहे.