धक्कादायक : मुलाकडून गावठी पिस्तूल हिसकावतांना आईच्या हाताला लागली गोळी

छत्रपती शिवाजी नगरातील घटना; मुलाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दारूच्या नशेत हातात गावठी पिस्तूल घेवून घरी आलेल्या मुलाच्या हातातून गावठी पिस्तूल हिसकावत असतांना आईच्या हाताला गोळी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित मुलाला अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली. कलाबाई प्रकाश सोनवणे (वय-६०) रा. छत्रपती शिवाजी नगर, जळगाव असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, कलाबाई प्रकाश सोनवणे (वय ६०, रा. शिवाजीनगर, जळगाव) या महिला आपल्या पती, दोन मुले व सून यांच्यासोबत वास्तव्याला आहे. त्या जळगाव महापालिकेत आरोग्य सेविका म्हणून सेवानिवृत्त आहेत. शनिवार ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा रोहित प्रकाश सोनवणे हा दारू पिऊन घरी आला. त्याच्या हातात गावठी कट्टा होता. त्यावेळी कलाबाई यांनी मुलाच्या हातातून कट्टा हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कट्ट्यातून गोळी सुटली व ती कलाबाई सोनवणे यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ लागल्याने दुखापत झाली. रक्तस्त्राव होत असताना त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शस्त्रक्रिया करून हातातील गोळी काढण्यात आली. याप्रकरणी कलाबाई सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रोहित सोनवणे याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content