



जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. घरमालक उज्जैन येथे महाकाल दर्शनासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्याने मध्यरात्री घरात प्रवेश केला. प्राथमिक माहितीनुसार, या चोरीत सुमारे ४५ ते ४६ तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास झाली असून, चोरी गेलेल्या ऐवजाची किंमत साधारण ५० ते ५५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नेमका किती ऐवज चोरीला गेला, हे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक कुटुंबासह उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची माहिती चोरट्याला मिळाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री सुमारे १.३० ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्याने बेडरूमकडे मोर्चा वळवला. तेथील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड ताब्यात घेतली. चोरी केल्यानंतर चोरटा घटनास्थळावरून पसार झाला. सकाळी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
भरवस्तीत असलेल्या घरात झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे विश्वकर्मा नगरसह रामेश्वर कॉलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रहिवासी परिसरात रात्रीच्या वेळी चोरट्यांनी एवढी मोठी घरफोडी केल्याने पोलिसांच्या गस्तीसह परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक तपासात एका संशयित चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. त्यामुळे या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे. चोरीचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घरातील कपाट, दरवाजे तसेच इतर ठिकाणांहून आवश्यक भौतिक पुरावे आणि ठसे गोळा करण्याचे काम करण्यात आले. याशिवाय चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. मात्र, श्वान पथकाने घराच्या मागील आणि पुढील परिसरातच घुटमळत राहिल्याने चोरट्याचा ठोस माग काढण्यात यश आले नाही. त्यामुळे आता पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरून मिळालेले ठसे तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाला गती देण्यात आली आहे.
दरम्यान, चोरीला गेलेल्या सोन्याचे नेमके वजन आणि किंमत तसेच रोकड किती होती, याबाबतची अधिकृत माहिती गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या प्राथमिक माहितीनुसार ४५ ते ४६ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून चोरीचा एकूण ऐवज साधारण ५० ते ५५ लाख रुपयांचा असल्याची प्राथमिक चर्चा आहे. घटनेची गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून तपास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. चोरट्याचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासासह सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या घरफोडीमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा घरांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. घरमालक बाहेरगावी गेल्याची माहिती चोरट्यापर्यंत कशी पोहोचली, चोरीच्या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि सीसीटीव्हीत कैद झालेला संशयित नेमका कोण आहे, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



