अखेर ठरले : जळगावातून शिवसेना-उबाठातर्फे करण पवार मैदानात !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून सस्पेन्स लागून असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आधीच माजी आमदार स्मीताताई वाघ यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी विरोधकांतर्फे अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. आधी राष्ट्रवादीने ही जागा लढविलेली असली तरी यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला ही जागा आली. यात उमेदवारीसाठी जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील व पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांची नावे आघाडीवर आली. यानंतर, अमळनेरच्या नेत्या ललीताताई पाटील यांनी पक्षात प्रवेश घेतल्याने त्यांचे नाव चर्चेत आले. यानंतर खासदार उन्मेषदादा पाटील वा त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांच्यापैकी एकाला तिकिट मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. तर अलीकडच्या काही दिवसांमध्ये पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण बाळासाहेब पवार यांचे नाव समोर आले. आणि अखेर याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांनी आधी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत आज उन्मेषदादा पाटील यांच्यासह मातोश्रीवर शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला. यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यामुळे आता जळगावातून भाजपच्या स्मिता उदय वाघ यांचा करण बाळासाहेब पवार यांच्याशी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content