शिवसेना नव्हे…औरंगजेब सेना ! : भाजपची टीका

मुंबई प्रतिनिधी । औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून शिवसेनेने नेहमीच कचखाऊ भूमिका घेतली असून ही शिवसेना नव्हे तर औरंगजेब सेना असल्याची तिखट टीका आज भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करण्यासाठी आम्ही १९९५मध्ये महापालिकेत प्रस्ताव दिला होता. युतीच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने नामांतराचा प्रस्ताव बाजूला केला. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकदा नव्हे तर दोनदा नामांतराचा प्रस्ताव फेटाळला, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आज शिवसेना मांडीला मांडी लावून बसली आहे.

उपाध्ये पुढे म्हणाले की, भाजपने औरंगाबाद पालिकेत चार वेळा नामांतराचा प्रस्ताव दिला आहे. पण शिवसेनेने हा प्रस्ताव दाखल करून घेतला नाही. तसेच बोर्डावरही हा प्रस्ताव आणला नाही. भाजपचे तत्कालीन नगरसेवक राजू शिंदे यांनी महापौरांना स्मरणपत्रं लिहिले असता वारंवार स्मरण पत्रं लिहू नये, असं महापौरांनी इतिवृत्तात म्हटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. औरंगाबादच्या विषयात शिवसेनेची भाषा ही औरंगजेबासारखी आहे. शिवसेना ही औरंगजेबाची सेना झाली आहे. ते बोलतात एक आणि करतात वेगळच. जेव्हा जेव्हा नामांतराची संधी चालून आली तेव्हा तेव्हा शिवसेनेने माघार घेतली. औरंगाबादच्या नामांतराकडे साफ दुर्लक्ष केलं, असा आरोप त्यांनी केला.

Protected Content