अरे व्वा. . . आली विना इंजेक्शनची कोरोना लस : तीन डोसमध्ये मिळणार अभेद्य कवच !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाच्या बचावापासून अभेद्य कवच प्रदान करणारी झायडस कॅडिला कंपनीची लस अखेर बाजारात येणार असून यात कोणत्याही प्रकारच्या इंजेक्शनचा वापर करण्यात येणार नसल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून झायडस कॅडिला कंपनीची झायकॉव्ह-डी या नावाने लस येणार असल्याची चर्चा सुरू होती. आता ही प्रतिक्षा संपली असून सदर लस लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं या लसीला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता ही लस प्रत्यक्ष वापरासाठी बाजारात दाखल झाली  असून सरकारनं या लसीची खरेदी सुरू केली आहे.

आतापर्यंत जगभरातील अनेक देशांत वापरण्यात येणार्‍या लसी या दोन डोसच्या आहेत. काही लसी या सिंगल डोसदेखील आहेत. मात्र झायडस कँडिलाची ही लस तीन डोसची असणार आहे. विशेष म्हणजे ही लस घेण्यासाठी सुईची गरज लागणार नाही. भारतात उपलब्ध होणारी ही पहिली इंजेक्शन विरहीत म्हणजेच नीडललेस लस असणार आहे.

झायकोव्ह-डी ही लस डीएनएवर आधारित असून इतर लसींच्या तुलनेत ही लस साठवण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीची आहे. २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात दीर्घकाळापर्यंत तर २५ अंश तापमानातदेखील ही लस ४ महिने साठवून ठेवणं शक्य होतं. २८ दिवसांच्या अंतरानं या लसीचे डोस देण्यात येणार आहे. पहिला डोस २८ दिवसांनी, दुसरा डोस त्यानंतर २८ दिवसांनी आणि तिसरा डोसही २८ दिवसांनी देण्यात येईल.

ही लस घेण्यासाठी सुई टोचून घेण्याची गरज नाही. जेट इंजेक्टरचा वापर करून ही लस टोचण्यात येणार आहे. हाय प्रेशरचा वापर करून नागरिकांच्या त्वचेत ही लस सोडली जाईल. कंपनीनं या लसीच्या एका डोसची किंमत २६५ रुपये ठेवली असून जीएसटीसह एका लसीची किंमत ३५८ रुपये असणार आहे. सध्या मात्र सरकारकडून ही लस खरेदी करण्यात येणार असल्याने नागरिकाना ती मोफत देण्यात येणार आहे.

 

 

Protected Content