…आता राहूल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’ !

नवी दिल्ली-वृत्तसंस्था | आधी कन्याकुमारी ते काश्मीर या मार्गावर भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता राहूल गांधी पूर्व ते पश्मीम भारताला जोडणारी भारत न्याय यात्रा काढणार असून आज याबाबत घोषणा करण्यात आली.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी ‘भारत न्याय यात्रा’ सुरू करणार आहेत. १४ जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि २० मार्चला मुंबईत संपेल. या कालावधीत ही यात्रा १४ राज्ये आणि ८५ जिल्ह्यांचा समावेश करणार आहे. राहुल गांधी बसने आणि पायी ६ हजार २०० किलोमीटरहून अधिक प्रवास करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवी झेंडी दाखवतील.

या संदर्भात, कॉंग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी पक्षाच्या मुख्यालयात प्रसारमाध्यमांना सांगितले की, भारत जोडो यात्रेनंतर कॉंग्रेस पक्ष भारत न्याय यात्रा काढणार आहेत. मणिपूरपासून सुरू होऊन नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमार्गे महाराष्ट्रात संपेल. याशिवाय २८ डिसेंबरला कॉंग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त पक्षाची नागपुरात मेगा रॅली होणार आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत भारत जोडो यात्रा काढली होती. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेला १४५ दिवसांचा हा प्रवास जम्मू-काश्मीरमध्ये संपला. त्यानंतर राहुल यांनी ३५७० किलोमीटरच्या प्रवासात १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेश कव्हर केले होते. या यात्रेला अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला होता. यानंतर आता राहूल गांधी पुन्हा एकदा यात्रेवर निघत असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content