कोविडच्या प्रतिकारासाठी राज्यात ‘टास्क फोर्स’ गठीत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोविड-१९च्या नवीन व्हेरियंटचा प्रकोप वाढत असल्याने याच्या प्रतिकारासाठी राज्य सरकारने ‘टास्क फोर्स’ गठीत केल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड-१९ या विषाणूचा जे-१ या व्हेरियंटचा संसर्ग वाढतांना दिसून येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची निर्मिती करण्यात आली होती. या अनुषंगाने याची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक आणि बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात ३७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यानंतर ठाणे आणि पुण्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हा नवीन व्हेरियंट प्राणघातक नसला तरी काळजी घेण्याची गरज असल्याने राज्य सरकार आता सतर्कता बाळगत असल्याचे यातून दिसून आले आहे.

Protected Content