केंद्राप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांनाही द्या

पाचोरा, प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या ११ टक्के महागाई भत्त्याप्रमाणे राज्य कर्मचा-यांनाही वाढीव महागाई भत्ता द्या  अशी मागणी राज्य सरकारी गट – “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यंमत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

केंद्र शासनाने कर्मचा-यांना १ जानेवारी २०२० पासून ४ टक्के, १ जुलै २०२० पासून ३ टक्के आणि १ जानेवारी २०२१ पासून ४ टक्के असा एकूण ११ टक्के वाढीव महागाई भत्ता मंजूर केला आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचा-यांना एकूण २८ टक्के महागाई भत्ता झाला आहे. केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता वाढ राज्यात देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र हा निर्णय घेण्यात उशीर होत असल्यामुळे थकबाकी शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत आहे. जुलै २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील ५ महिन्यांची थकबाकीदेखील अद्याप राज्य सरकारी कर्मचा-यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचा-यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

थकबाकीमुळे महागाई भत्त्याचे प्रमाण वाढत असून महागाईला कर्मचा-यांना तोंड द्यावे लागत असल्याने महागाई भत्त्याची ५ महिन्यांची थकबाकी तसेच केंद्राप्रमाणे ११ टक्के महागाई भत्ता वाढ त्वरित देण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही महासंघाने केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्य सचिव व  वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनाही दिली गेली आहे. संघटनेच्या निवेदनावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, कार्याध्यक्ष भिकू साळुंके, सरचिटणीस प्रकाश बने यांच्या सह्या आहेत.

 

Protected Content