Home Cities जळगाव आता कोणत्याही सह दुय्यम निबंधक कार्यालयात होणार मालमत्तेची नोंदणी!

आता कोणत्याही सह दुय्यम निबंधक कार्यालयात होणार मालमत्तेची नोंदणी!

0
245


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत जळगाव जिल्ह्यातील मालमत्ता नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. त्यानुसार, आता ३० एप्रिल २०२५ पासून जिल्ह्यात नवीन ‘संयुक्त दुय्यम निबंधक कार्यालये’ कार्यान्वित झाली आहेत. यामुळे जिल्ह्यातील नागरिक कोणत्याही सह दुय्यम निबंधक कार्यालयात आपल्या मालमत्तेची नोंदणी करू शकणार आहेत.

राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. नोंदणी अधिनियम १९०८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार (क्रमांक EST-2025/466/C.R.139/M-1, दिनांक ३० एप्रिल २०२५), जळगाव जिल्ह्यातील सर्व नोंदणी कार्यालयांना संयुक्त दुय्यम निबंधक कार्यालये म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना मालमत्ता नोंदणीसाठी तालुका विशेष कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. ते आपल्या सोयीनुसार जिल्ह्यातील कोणत्याही निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होणार असून नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान आणि सोयीस्कर होईल, असे मत व्यक्त होत आहे.

सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सुनील पाटील यांनी या निर्णयाची माहिती दिली. शासनाच्या या महत्त्वपूर्ण पावलामुळे जिल्ह्यातील नागरिकांना नोंदणी प्रक्रियेसाठी अधिक चांगली आणि सुलभ सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


Protected Content

Play sound