
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गेल्या दीड महिन्यापासून जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात साखरेच्या दरात तब्बल ४५ ते ५० टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी ४२ रुपये प्रति किलो या दराने मिळणारी साखर आता थेट ७० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. या अचानक झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींचे मासिक बजेट पार कोलमडले असून खिशाला मोठी झळ बसत आहे.

सध्या प्रमुख साखर कारखान्यांमध्ये साखरेचा साठा अपुरा असल्याने किरकोळ व घाऊक बाजारात आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा अतिशय कमी होत असल्याने साखरेचे भाव सातत्याने वाढत असल्याचे जळगाव शहरातील ठोक विक्रेते संतोष आहुजा यांनी स्पष्ट केले आहे. या तीव्र दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे. दैनंदिन वापरातील चहा, विविध गोड पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ महागल्याने घरगुती खर्चाचा ताण वाढला आहे. केवळ घरगुती बजेटच नव्हे, तर स्थानिक मिठाई उत्पादक, चहा विक्रेते आणि हॉटेल्स चालवणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचा उत्पादन खर्च वाढल्याने त्यांनाही मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यांकडील अपुरा साठा आणि रोडावलेली आवक यामुळे साखरेच्या किमती उच्चांकावर पोहोचल्या आहेत. येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्ववत न झाल्यास जळगावकरांना आणखी काही काळ महागड्या साखरेचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी शासन स्तरावरून तातडीने काही उपाययोजना केल्या जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



