Home क्राईम अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात ; 3 मोटारसायकली हस्तगत

अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात ; 3 मोटारसायकली हस्तगत

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास करताना एमआयडीसी पोलिसांनी एका अट्टल दुचाकी चोरट्याला भुसावळ येथून शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 95 हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात राहणारे मनोज शंकराव गरुड यांच्या मालकीची सीबी शाईन मोटारसायकल क्रमांक MH-19 DD 8323 ही 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजता त्यांचा मुलगा प्रथम गरुड याने एमआयडीसी जळगाव येथील व्ही-सेक्टरमधील लिड्स इंडस्ट्रीज कंपनीच्या परिसरात उभी केली होती. सायंकाळी सुमारे 6 वाजता काम आटोपून परत आल्यानंतर संबंधित मोटारसायकल तेथे दिसून आली नाही. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज गरुड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 670/2026, भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि योगेश घुगे यांचा पथकात समावेश करण्यात आला.

तपासादरम्यान पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. मिळालेल्या माहितीच्या आधारे मोहम्मद शहा अस्लम शहा याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर चोरीच्या आणखी मोटारसायकलींबाबत माहिती मिळाल्याचे सांगण्यात आले. आरोपीकडून 25 हजार रुपये किमतीची सीबी शाईन मोटारसायकल क्रमांक MH-19 DD 8323 हस्तगत करण्यात आली. तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील आणखी एका गुन्ह्यातील 20 हजार रुपये किमतीची क्रमांक नसलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त करण्यात आली. या मोटारसायकलचा चेसिस क्रमांक MBLHAR075HHL27654 असा आहे.

याशिवाय 50 हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची सीटी 100 मोटारसायकलही पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केली. या मोटारसायकलीला क्रमांक नसून तिचा चेसिस क्रमांक MD2AI8AY1JWF06484 असा आहे. अशाप्रकारे पोलिसांनी आरोपीकडून एकूण 95 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसांच्या तपासामुळे दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आला. आरोपीकडून आणखी काही चोरीच्या वाहनांची माहिती मिळते का, तसेच या चोरीच्या घटनांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.  ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीष पाटील, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी तसेच पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि योगेश घुगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


Protected Content

Play sound