नवी दिल्ली वृत्तसंस्था । संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची लवकरच अधिसूचना निघणार असून ऑगस्ट अखेर वा सप्टेबरच्या प्रारंभी अधिवेशन सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.
ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यासंदर्भातील अधिसूचना एक-दोन दिवसांत जारी होण्याची चिन्हे आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १२ मार्च रोजी गुंडाळण्यात आले होते. त्यानंतर देश अजूनही कोरोनाच्या संकटातून सावरलेला नाही. मात्र, संसदेच्या दोन्ही अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा अधिक अंतर असू नये, असा नियम असल्यामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कोरोनाच्या आपत्तीमुळे व्हर्च्युअल अधिवेशन घेण्याचा विचार समोर आला होता. मात्र, तांत्रिकदृष्टया असे अधिवेशन घेणे शक्य नसल्याने प्रत्यक्षात अधिवेशन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना संक्रमणाची भीती लक्षात घेऊन लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दर दिवशी प्रत्येकी चार तास चालण्याची शक्यता आहे. सकाळी लोकसभेचे अधिवेशन भरेल तर दुपारनंतर राज्यसभेचे कामकाज होणार असल्याचेही समजते. यावेळच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधीही अत्यंत मर्यादित राहणार आहे. अधिवेशन सुरू असतांना अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी अभ्यागतांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार असून खासदारांच्या स्वीय सहाय्यकालाही संसदेत प्रवेश मिळणार नसल्याचे समजते.