मुंबई वृत्तसंस्था । बॉलिवूड सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजाविरोधात गाझियाबाद कोर्टात अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीने रेमोवर पाच कोटी रुपयांच्या फसवणूकीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी गाजियाबाद कोर्टाने न्यायालयात सुनावणीदरम्यान गैरहजर राहिल्यानंतर त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
गाझियाबादमधील सतेंद्र त्यागी यांनी रेमोवर कोटयवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. चित्रपटांमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली रेमोने त्यांच्याकडून पैसे घेतले होते. परंतू त्यानंतर त्याने कुठल्याही प्रकारची गुंतवणूक केली नाही. याबाबत विचारणा केली असता रेमोने पैसे परत करण्यास नकार दिला. शिवाय त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्नही केला, असा आरोप सतेंद्र त्यागी यांनी केले आहेत. त्यानंतर सिहानी गेट पोलिस ठाण्यात त्यांनी रेमोबाबत तक्रार केली. अखेर हे प्रकरण कोर्टात गेले. परंतु या फसवणूक प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान रेमो गैरहजर राहिला त्यामुळे त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.