विद्यापीठाला नाव दिल्याने बहिणाबाईंचा सार्थ गौरव – प्रा.संदीप पाटील

pankaj college

चोपडा, प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिल्याने त्यांच्या प्रतिभेचा योग्य सन्मान झाल्याचे समाधान आहे, असे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी नुकतेच येथे व्यक्त केले. पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित कला महाविद्यालयातील मराठी व संरक्षणशास्र विभागातर्फे विद्यापीठ नामविस्तार वर्षपूर्ती निमित्त आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

 

प्रा. पाटील पुढे म्हणाले की, बहिणाबाई चौधरी समाजातील आर्थिक विषमता आपल्या कवितेतून व्यक्त करतांना म्हणतात. “सोन्या- रुप्याने मढला मारवाड्याचा बालाजी, कुनब्याचा विठोबा पाना-फुलांमधी राजी”, मानवी मनाची चंचलता स्पष्ट करताना त्या ‘मन वढाय’ असल्याचं सांगतात तर मुलीला माहेर असावे म्हणून माय सासरी नांदत असते, असे भाव काव्यातून व्यक्त करतात. बहिणाबाईंनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात साक्षेपी मार्गदर्शन केले असून त्यांच्या कविता अंतरमनाला स्पर्शून जातात. असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी कवयित्रि बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. किशोर पाठक होते. प्रास्ताविक प्रा.दिपक देवरे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.अ.दा.मोरे यांनी केले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content