नवी दिल्ली वृत्तसंस्था । अर्थशास्त्रातील २०१९ च्या नोबेलचे मानकरी ठरलेले भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बॅनर्जी यांच्या कार्याचा अभिमान आहे, अस म्हणत, पुढील वाटचालीसाठी पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छाही दिल्या.
अभिजित बॅनर्जी यांना अमेरिकेतील अन्य दोन अर्थतज्ज्ञांसह यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे. नोबेल पारितोषिक मिळवल्यानंतर विविध व्यासपीठांवर मुलाखती देताना बॅनर्जी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांनी त्यांचा दावा फेटाळत त्यांच्यावर टीकाही केली होती. सरकारच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून त्यांना ट्रोलही केले होते. तसंच, बॅनर्जी यांची संकल्पना असलेल्या काँग्रेसच्या न्याय योजनेची खिल्लीही उडवली होती. बॅनर्जी यांनी या टीकेला उत्तर देत भाजपलाही आकडे देण्याची तयारी दर्शवली होती.