भुसावळातील तापीवरील रेल्वेचा बंधारा कोरडाठाक ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । येथील रेल्वे स्थानकासह हजारो रेल्वे कर्मचार्‍यांना पाणी पुरवठा करणारा तापी नदीवरील ब्रिटीशकालीन बंधारा कोरडाठाक पडल्याचे भेसूर चित्र आज दिसून येत आहे.

भुसावळ शहराला पाणी पुरवठा करणार्‍या बंधार्‍याच्या (इंजिनघाट) वरील बाजूस रेल्वे प्रशासनाने एक मोठा बंधारा बांधला आहे. येथून रेल्वे फिल्टर हाऊसमधून शुध्द करण्यात आलेले पाणी हे भुसावळ रेल्वेचे विविध विभाग, कर्मचार्‍यांची निवाससस्थाने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रेल्वे स्टेशनला पुरविण्यात येते. अर्थात, दररोज हजारो नागरिकांना येथून पाणी पुरवठा होत असतो. मात्र यंदा तापी नदीपात्र अक्षरश: कोरडे पडले आहे. गेल्या अनेक दशकांमध्ये अशा प्रकारची स्थिती नसल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. यामुळे तापी नदीचे पात्र हे अक्षरश: भकास वाटत आहे. या बंधार्‍यात अगदी अल्प प्रमाणात पाणी साठा आहे. दरम्यान, बंधारा हा उघडा पडल्यामुळे यात प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय, नदीच्या पात्रात वाळूदेखील खूप जास्त प्रमाणात साचलेली आहे. येथून गाळ आणि वाळू काढण्याचे नियोजन केल्यास बंधार्‍यातील पाणीसाठ्याच्या प्रमाणात निश्‍चितच वाढ होऊ शकते. मात्र यासाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची तरतूद केल्याचे दिसत नाही.

दरम्यान, या संदर्भात रेल्वे फिल्टर हाऊसचे वरिष्ठ विभागीय अभियंता म्हणजेच सिनियर सेक्शन इंजिनिअर आर. डी.अग्रवाल यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, आम्ही दर महिन्याला हतनूर धरणाला पाण्याच्या अवर्तनासाठी पैसे भरतो. यामुळे तीन ते चार दिवसानंतर रेल्वेला पाणी पुरवठा केला जातो.रेल्वे प्रशासनाने पाण्यासाठी दिनांक २९ मार्चला पत्र दिले होते. त्यानंतर ३ एप्रिलला दुसरे पत्र हतनूर धरणाला देऊनही रेल्वेला पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. याऐवजी हतनूर धरणातून पाटचारीद्वारे चोपडा परिसराकडे पाणी सोडण्यात आले. दर महिन्याला १००० ते १२०० क्युसेक पाणी हतनूर धरणातून रेल्वेला सोडले जाते. रेल्वेचे अप्पर व लोअर असे दोन बंधारे बांधण्यात आले असून यातल्या वरील बंधार्‍याची २ मिटर तर लोअर बंधार्‍याची ३७० मिटर पाण्याची लेव्हल असते. सद्यस्थितीत दोन्ही बंधार्‍यांमध्ये फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. रेल्वे कर्मचार्‍यांना घेऊन फिल्टर हाऊसला पाईप व्दारे होणार्‍या पुरवठ्याच्या ठिकाणी संबंधीत खात्याचे कर्मचारी सफाई करून गाळ काढत आहेत. यामुळे बंधार्‍यातील शिल्लक पाणी हे रेल्वे प्रवाशी गाड्यांना,रेल्वे कॉटर,कर्मचार्‍यांना पुरवठा केला जातो.अशी माहिती सिनियर सेक्शन इंजिनिअर यांनी दिली. मात्र पाणी टंचाईमुळे रेल्वे प्रशासनासमोर अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाल्याची माहिती श्री. अग्रवाल यांनी दिली.

पहा : तापी नदीची भेसूर स्थिती दर्शविणारा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content