जळगाव, प्रतिनिधी | जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेचा निधी राज्य सरकारने रोखला नसून त्यावर स्टे आला होता. यातील ८०० कोटींच्या कामांवरील स्टे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उठवला असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज (दि.११) एका पत्रकार परिषदेत दिली.
आज झालेल्या शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आगामी १६-१७ महिन्यांत होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांची आखणी, पदाधिकाऱ्यांना सूचना व त्यांच्या अपेक्षा व पक्ष बांधणीसाठी आढावा या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक आमदाराला एका विधानसभा क्षेत्रात अतिरिक्त काम करण्याच्या सूचना यावेळी ना. पाटील यांनी दिल्या. प्रत्येक आमदाराला त्यांच्या शेजारील तालुका दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले, असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.
तसेच जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प संदर्भात कार्यकर्त्यांच्या सूचना घेऊन त्यासंदर्भात संबधित अधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक बोलवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
१० वीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करणार
१० वीपर्यंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही मराठी भाषा सक्तीची करण्यात यावी, असा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या वाहनाच्या समोरच्या काचेवर त्यांचे चित्र लावल्याने वाहन चालकास ४०० रुपयांचा दंड झाला आहे. याबाबत ते म्हणाले की, कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात चित्र लावले असेल आणि जर दंड झाला असेल तर तो भरला पाहिजे. त्याचे समर्थन होवू शकतच नाही.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2557485874533728/