नाथाभाऊंच्या निर्णयाचे दुःख आहे — खासदार रक्षा खडसे

जळगाव: प्रतिनिधी । ‘नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. पण, मी भाजपकडून निवडून आले आहे आणि यापुढेही भाजपतच काम करत राहणार आहे’, अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.

रक्षा या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे यांनी मोजक्या शब्दांत भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, एकनाथ खडसे यांनी व्यक्तिगत कारणामुळे भाजपचा राजीनामा दिला आहे. पक्ष सोडण्याबाबत विचारले असता तशी शक्यता त्यांनी फेटाळली. मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जी काही जबाबदारी देईल; ती मी पूर्ण करणार आहे, असे त्या म्हणाल्या.

‘भाजपने नाथाभाऊंना भरपूर काही दिले आहे, हे त्यांनीसुद्धा नमूद केले आहे. सर्वजण पक्षामुळेच मोठे होत असतात. पण नाथाभाऊंचेही योगदान पक्षवाढीसाठी होते, हे नाकारता येत नाही. त्यांनी ४० वर्षे पक्षासाठी दिली आहेत. त्यांच्यामुळे राज्यात पक्ष मोठा झाला, हे मान्यच करावे लागेल. मी सांगितले तसेच झाले पाहिजे, असा आग्रह नाथाभाऊंचा कधी नव्हता. त्यांनी माझ्यावर कधीही दबाव टाकला नाही. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे मीही राजीनामा दिला पाहिजे, असे काही नाही’, असेही रक्षा खडसेंनी नमूद केले.

एकनाथ खडसे यांनी आजच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ‘मी एकनाथ खडसे माझ्या वैयक्तिक कारणात्सव भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे’, असे दोन ओळींचे राजीनामापत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवले आहे.

खडसे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश मुख्यालयात शुक्रवारी हा प्रवेश सोहळा होणार आहे. खडसे यांच्यासोबत आता भाजपमधून आणखी कोणकोण राष्ट्रवादीत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, असे सांगितले जात आहे. सासरेबुवा राष्ट्रवादीत आणि सूनबाई भाजपात असे चित्र खडसेंच्या घरात पाहायला मिळणार आहे.

 

Protected Content