युनो सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी भारताची नियुक्ती

नवी दिल्ली । संयुक्त राष्ट्रसंघच्या सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी भारताची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात भारताला १९३ पैकी तब्बल १८४ मते पडली आहेत.

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातून भारताची संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती २०२१-२२ अशी दोन वर्षांसाठी असणार आहे. यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ पैकी १९२ सदस्य राष्ट्रांनी भाग घेतला. यातून भारताला तब्बल १८४ मते मिळाली आहेत. विशेष बाब म्हणजे भारताच्या नियुक्तीच्या बाजूने चीन व पाकिस्तान सारख्या विरोधी देशांनीही मतदान केले आहे. भारताची या पदासाठी आठव्यांदा निवड झालेली आहे. या निवड प्रक्रियेत भारतासह मेक्सिको, नॉर्वे व आयर्लंडची अस्थायी सदस्य म्हणून निवड झालेली आहे.

देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेवरील भारताच्या नियुक्तीचे स्वागत एका ट्विटच्या माध्यमातून केले आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टि. एस. तिरूमूर्ती यांनी हा जागतिक पातळीवरील भारताचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीच्या नेतृत्वावरील हे शिक्कामोर्तब असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Protected Content