…तर मोदींच्या प्रतिमेस धक्का बसेल – शिवसेनेचा इशारा

मुंबई प्रतिनिधी । सीमेवर सुरू असणार्‍या चीनच्या मनमानीला आळा घातला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का बसेल असा इशारा आज शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज भारत व चीनमधील तणावावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पूर्व लडाखच्या गलवान व्हॅली सीमेवर सोमवारी रात्री चीन आणि भारत सीमेवर ही दंगल झाली. त्यात आपले २० जवान शहीद झाल्याचे अधिकृतपणे सांगायला बुधवार उजाडावा लागला. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षात अनेकदा झाले. पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने भारतावर सरळ हल्ला केला. भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्‍चर्य वाटते.

यात पुढे नमूद केले आहे की, चीनबरोबर जो संघर्ष सुरू आहे त्याचे कूळ आणि मूळ पंडित नेहरुंच्या फसलेल्या परराष्ट्र धोरणात आहे, असं जाहीर सभांमधून सांगितल्याने टाळ्या मिळतील. पण आज जवानांची बलिदाने सुरू आहेत. ती थांबवण्याची जबाबदारी मोदी सरकारचीच आहे, असं सांगतानाच गडबड सीमेवर नसून दिल्लीत आहे. दिल्लीची सरकारे नामर्द आहेत म्हणून सीमेवर शत्रू अरेरावी करतो, असे सहा वर्षांपूर्वी जोरकसपणे सांगणारे मोदी आज दिल्लीचे सर्वसत्ताधीश आहेत. त्यामुळे आज जे घडले आहे, त्याचा प्रतिकार मोदींनाच करावा लागेल. अन्यथा त्यांच्या प्रतिमेला धक्का बसेल असा इशारा शिवसेनेने या अग्रलेखातून दिला आहे.

Protected Content