विभागीय क्रीडा स्पर्धेत रामरक्षा इंग्लिश स्कूलचा डंका; ११ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये राम रक्षा इंग्लिश स्कूल पाडळी येथील ११ मुलींची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकाच शाळेचे ११ विद्यार्थी मैदानी स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ आहे.

क्रीडा व युवक संचालनालय पुणे तथा क्रीडा प्रबोधिनी अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अमरावती विभागीय शालेय मैदानी (ॲथलेटिक्स) क्रीडा स्पर्धा अकोला येथे 16, 17, 18 व 19 ऑक्टोंबरला संपन्न झाल्यात. या क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, अकोला व  बुलढाणा जिल्ह्यासह अमरावती महानगर पालिका व अकोला महानगर पालिका असे सात शालेय संघाचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होते.

बुलढाणा तालुक्यातील राम रक्षा इंग्लिश स्कूल पाडळी येथील अकरा विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावर नैपुण्य दाखवीत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे दिनांक 29 ऑक्टोंबर ते 01 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यात 14 वर्षे आतील वयोगटांमध्ये कु. हुमान्सी मूत्रे हिने 200 मीटर, 400 मीटर  व 600 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

17 वर्षे आतील वयोगटामध्ये कु. पायल गायकवाड हिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळविला तसेच 400 मीटर अडथळा (हार्डल्स) स्पर्धेत कु. सिद्धी डिडोळकर हि द्वितीय आली. तर 100 मीटर व 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत कु. पूनम बनगाळे हिने द्वितीय क्रमांक मिळविला असून चार बाय 100 मीटर व चार बाय 400 मीटर या दोन्ही रिले मध्ये कु. सिद्धी डिडोळकर, कु. पायल गायकवाड, कु. पूनम बनगाळे , कु. पूजा लोखंडे व कु. गायत्री तायड़े या विद्यार्थिनींनी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.

19 वर्ष आतील वयोगटामध्ये कु. जिज्ञासा जाधव हिने 200 मीटर स्पर्धेत प्रथम तर 100 मीटर स्पर्धेत द्वितीय आली आहे तसेच चार बाय 100 मीटर व चार बाय 400 मीटर या दोन्ही रिले मध्ये कु. जिज्ञासा जाधव, कु. दिव्या जाधव, कु. दीक्षा जाधव, कु. स्वाती राठोड व कु. छाया गाढवे यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच चार किलोमीटर मुलींच्या क्रॉस कंट्री स्पर्धेतही दिव्या जाधव, दीक्षा जाधव, या दोन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली आहे.

यशस्वी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय माता पिता तसेच राम रक्षा इंग्लिश स्कूल पाडळी या संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. कैलास पवार, संस्थेचे संचालक सुरेश पवार प्राचार्य निलेश पवार सर, क्रीडा शिक्षक कपील इंगळे यासह विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रशिक्षक विजय उर्फ भाऊ वानखेडे, राजेश डिडोळकर व दीपक जाधव यांना देत आहे. तसेच रामरक्षा इंग्लिश स्कूल पाडळीच्या सर्व शिक्षकांचे खेळाडू विद्यार्थ्यांना मोलाचे योगदान लाभले. अकोला येथे संपन्न विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याने दमदार कामगिरी करत संपूर्ण विभागात बुलढाणा जिल्ह्याचा डंका मिरविला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेकरिता  निवड झालेल्या जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केल्याबद्दल क्रीडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून विजयी स्पर्धकांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Protected Content