निर्भया प्रकरण : २२ जानेवारीला आरोपींना ‘फाशी’ नाही

nirbhaya case

नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या याचिकेवरील सुनावणीत म्हटले की, २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. मुकेश सिंहचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले.

दरम्यान, दिल्ली सरकारने आज गुरुवारी निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. या प्रकरणातील चारही दोषींना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली असून त्यांना २२ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी दिली जावी असा निर्णय देत पतियाळा हाऊस कोर्टाने ७ जानेवारीला डेथ वॉरंट जारी केला होता. त्यानंतर यापैकी एक दोषी मुकेश सिंह याने तिहार तुरुंगातून दयेचा अर्ज केला होता. दया अर्ज प्रलंबित असल्याने डेथ वॉरंटवर स्वत:च स्थगिती येते. फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरेल. तुरुंग प्रशासनाने शुक्रवारी १७ जानेवारी पर्यंत कोर्टाला स्टेटस रिपोर्ट द्यायचा आहे.

Protected Content