राज्यस्तरीय प्रतिभासंगम संमेलनात आदित्यने पटकाविला प्रथम क्रमांक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण आणि हिंदी कविता हा तसा परस्पर विरोधाभास… पण तरीदेखील कलाक्षेत्राची आवड जपणार्‍या डॉक्टर विद्यार्थ्याने थेट राज्यस्तरीय प्रतिभासंगम संमेलनात हिंदी कविता सादर करुन डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या (डीयूपीएमसी) शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व राष्ट्रीय कला मंच आयोजित १९ वे राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन १७ व १८ मे रोजी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देणार्‍या या प्रतिभासंगम संमेलनातील स्व.प्रा.द.मा.मिरासदार साहित्यनगरीत जळगाव येथील गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आदित्य निर्वळ याने हिंदी कविता सादरीकरण स्पर्धेत सहभाग नोंदविला. महिला-मुलींवर होत असलेल्या अत्याचार, त्याने सुन्न होणारे समाजमन आणि हे चित्र बदलविण्यासाठी वापसले आओ छत्रपती शासन असा संदेश देणारी कविता प्रभावीपणे आदित्यने सादर केली. त्याच्या सादरीकरणाने उपस्थीतांच्या अंगावर शहारे तसेच डोळ्यात अश्रू देखील आले. उत्कृष्ठ सादरीकरणामुळे राज्यस्तरीय संमेलनात आदित्य निर्वळला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. मराठी अभिनेते व दिग्दर्शक ऋषिकेश जोशी, दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या हस्ते ट्रॉफी, रोख रक्‍कम व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेत छंद म्हणून कवितांचे लिखाण करणार्‍या आदित्यच्या यशामुळे गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

आदित्यने प्राप्त केलेल्या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड आदिंनी कौतुक केले.

 

Protected Content