जळगावच्या निकिता पवारचे राज्यस्तरीय सुवर्ण यश; राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रत्नागिरी येथे सुरू असलेल्या ३५व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर कुमार गट तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत जळगावची निकिता दिलीप पवार हिने सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. जैन स्पोर्टस् अकॅडमी आणि जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनतर्फे खेळणाऱ्या निकिताने मुलींच्या ५५ किलो वजन गटात उत्कृष्ट कौशल्य दाखवत बॅंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले आहे.

निकिता पवार ही सतत उत्कृष्ट कामगिरी करणारी खेळाडू असून, नुकत्याच झालेल्या शालेय राज्य तायक्वांडो स्पर्धेतही तिने सुवर्णपदक मिळवले आहे. त्यामुळे आता ती शालेय राष्ट्रीय स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या सलग यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या तायक्वांडो क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशामागे प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि अजित घारगे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांनी निकिताच्या कौशल्यावर, शारीरिक प्रशिक्षणावर आणि मानसिक तयारीवर विशेष भर दिला. तिच्या नियमित सराव, चिकाटी आणि मेहनतीमुळे तिने राज्यस्तरावर सुवर्ण झळकावले.

निकिताच्या कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी तिचे कौतुक करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.