मुंबई प्रतिनिधी । अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने मध्य-पूर्वेत निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण आहे. आज सकाळ सत्रात सेन्सेक्सने ४१,८९३ अंकापर्यंत तर निफ्टीने १२,३७७ अंकांचा नवा विक्रम राष्ट्रीय शेअर बाजारात तयार केला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात सध्या सेन्सेक्स २७० अंकांच्या वाढीसह ४१८७० अंकांवर व्यवहार करत आहे. निफ्टी ७० अंकांच्या वाढीसह १२३२९ अंकांवर आहे. आजच्या सत्रात व्हीआयपी, चेन्नई पेट्रो, इन्फोसिस, अव्हेन्यू सुपरमार्ट, एसबीआय, एडलवाईज, इंडिया हौसिंग फायनान्स हे शेअर तेजीत आहेत. पॉवरग्रीड, ‘टीसीएस’ या शेअरला नफाखोरीचा फटका बसला. येस बँकेचा शेअर ८ टक्क्यांनी घसरला. बँकेने खासगी गुंतवणूकदाराची गुंतवणुकीची ऑफर नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी येस बँकेच्या शेअरची जोरदार विक्री केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सामान्य करदात्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून कर स्तर बदलणे किंवा वैयक्तिक करात कपात केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय विमा आणि इतर उद्योगांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा अर्थसंकल्पात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण आहे.