एनआयएची अमरावतीसह देशभरातील १९ ठिकाणी छापेमारी

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रीय तपास संस्थेने आजपासून देशातील १९ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. जिहादी दहशतवादी गटाचा पर्दाफाश करण्याच्या संदर्भात शोध सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसंच मागील आठवड्यात, एनआयएनं ४३ हून अधिक ठिकाणी शोध घेतला आणि आयएस मॉड्यूल प्रकरणाशी संबंधित १५ लोकांना अटक केली.

छापेमारीदरम्यान दहशतवादविरोधी तपास यंत्रणेनं मोठ्या प्रमाणात शस्त्रे, धारदार अवजारे, कागदपत्रे आणि विविध डिजिटल उपकरणे जप्त केली होती.

राष्ट्रीय तपास संस्थेकडून अमरावतीतील अचलपूर येथील एकाची चौकशी करण्यात आली. एनआयएचे पथक सोमवारी १८ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचलपूर येथील अकबरी चौक परिसरात धडकले. एनआयएच्या पथकानं अकबरी चौक येथील एका युवकाची चौकशी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार या युवकाच्या हालचालींवर एनआयए अनेक दिवसांपासून लक्ष ठेवून होती. सकाळी सहा वाजेपर्यंत या युवकाची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून हा युवक नागपूर येथे शिक्षण घेत असल्याचं देखील समोर आलंय.

पुण्यातील गुलटेकडी येथे देखील राष्ट्रीय तपास संस्थेकडून छापेमारी करण्यात आली. 19 वर्षीय साफवान शेखची एनआयएकडून चौकशी करण्यात आली आहे. साफवान शेख पुलगेट येथील अरिहंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. इसिसकडून चालवण्यात आलेल्या टेलिग्राममध्ये साफवानचा सहभाग असल्याचा संशय एनआयएला आहे. आज चौकशीदरम्यान साफवानजवळील इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले.

राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं 11 ऑगस्टला स्थानिक पोलिसांच्या मदतीनं भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली गावात छापेमारी केली होती. या छापेमारीत एनआयएनं ‘आयसिस’ दहशतवादी संघटनेशी संबंधीत आरोपीला अटक केली. शमील साकिब नाचण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पडघा-बोरीवलीमधून यापूर्वी चार जणांना दहशतवादी कारवाईच्या संशयावरून अटक करण्यात आली.

Protected Content