फुले मार्केट परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाची धडक कारवाई

जळगाव प्रतिनिधी । मनपाच्या अतिक्रमण पथकाने शनिवारी आणि आज रविवारी सकाळपासून कारवाईचा धडाका सुरु ठेवला असून शहराच्या बळीरामपेठ, बाजारपेठ व वर्दळीच्या भागात मनपाचे पथकाने कारवाई केली.

चौबे शाळा ते सुभाष चौकापर्यंत तसेच सुभाष चौक ते चित्रा चौक, राजकमल टाकी चौक परिसरातअतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईदरम्यान रस्त्यावरील अतिक्रमणधारकांना, दुकानदारांना हटकण्यात आले. शनिवारीही बाजाराचा दिवस असल्याने या निमित्त शहरातील सुभाष चौक, बळीराम पेठ, घाणेकर चौक, फुले मार्केट परिसर, शनिपेठ, सुभाष चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला असल्याचे दिसून आले. कारवाई पथकात नाना कोळी, नरेन गायकवाड, किशोर सोनवणे, भानुदास ठाकरे, पंकज कोळी, राजु वाघ, सोनवणे, नितीन पाटील आदींचा समावेश होता.

या कारवाईदरम्यान घाणेकर चौक, सुभाष चौक रस्त्यांवरील फळ, भाजीपाला विक्रेत्यांना हटकण्यात आले. मनपाचे वाहन पाहून हातगाडीधारक विक्रेते आपल्या हातगाड्या गल्लीबोळात घेवून जात होते. मनपा अतिक्रमण पथक घाणेकर चौकात अतिक्रमण पथकाची गाडी या ठिकाणी अचानकपणे आल्याने एकच भंबेरी या विके्रत्यांमध्ये उडाली होती. तसेच फुले मार्केटमध्ये एक वाहन आले असता तेथेही तारांबळ उडाली. जो तो आपली हातगाडी व साहित्य घेवून धावपळ करीत होता. यावेळी एक दोन हातगाडी वाल्यांना पकडले नंतर त्यांचे साहित्य परत करण्यात आले. नेहमीपेक्षा आज मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यांवर होते तसेच फळ, भाजीपाला विक्रेतेही मोठ्या प्रमाणावर होते. यामुळे मोठी गर्दी येथे जमली होती. मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे रात्रीही अतिक्रमणाची पथके तैनात करण्यात आली आहेत. रात्रीही शहरातील वेगवेगळ्या भागात अतिक्रमण पथके फिरली.

Protected Content