बिहारमध्ये एनडीएचीच सत्ता; ओपिनीयन पोलमधील कल

पाटणा वृत्तसंस्था । बिहार विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजपची आघाडी असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी दणदणीत बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा कल ओपिनीयन पोलमधून समोर आला आहे.

बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांसह सरकार स्थापन करेल, असा अंदाज टाईम्स नाऊ-सी व्होटरनं वर्तवला आहे. टाईम्स नाऊ-सी व्होटरनं बिहारमधील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण केलं. यापैकी १६० जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील, असं टाईम्स नाऊ-सी व्होटरचं सर्वेक्षण सांगतं. लक्षणीय बाब म्हणजे भाजप ८५ जागा जिंकून जेडीयूला मागे टाकेल. तर जेडीयूला ७० जागा जिंकण्यात यश येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२०१० मध्ये भाजपनं बिहारमध्ये जेडीयूसोबत निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्षांनी मिळून तब्बल २०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी भाजपचे ९१ उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी जेडीयूनं ११५ जागा जिंकल्या होत्या. सध्या जेडीयूचे ७१, तर भाजपचे ५३ आमदार आहेत. मात्र या निवडणुकीत ही स्थिती बदलणार असल्याचे या ओपीनियन पोलमधून दिसून आले आहे.

Protected Content