जळगाव भाजपचा वाद…जामनेरच्या दरबारात !

जळगाव प्रतिनिधी । स्थायी समिती सभापतींच्या नावाच्या निश्‍चीतीसह अनेक प्रश्‍नांवरून जळगाव भाजपमध्ये अस्वस्थता असून याच प्रकरणी नगरसेवकांच्या एका गटाने माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केल्याचे वृत्त आहे.

जळगाव महापालिकेत भाजपला अतिशय मोठे बहुमत असले तरी कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे भाजपवर टीक देखील होत आहे. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना मोठी आश्‍वासने दिली असली तरी याच्या पूर्ततेसाठी कोणताही प्रयत्न होत नसल्याने लोक टीका करत आहेत. सोशल मीडियात याबाबत खिल्ली उडविली जात आहे. तर पक्षाला अंतर्गत कलहाने देखील ग्रासल्याचे दिसून येत आहे. पक्षातील गट-तट हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे कुणापासून लपून राहिलेले नाही.

या पार्श्‍वभूमिवर, जळगावातील नगरसेवकांच्या एका गटाने सोमवारी आ. गिरीश महाजन यांनी जामनेर येथे भेट घेऊन जळगाव महापालिकेतील अडचणींचा पाढा वाचला. यात प्रामुख्याने अंतर्गत गटबाजीबाबत तक्रारी करण्यात आल्या. स्थायी समिती सभापतीपदासाठी अजूनही नाव फायनल झाले असून अनेकांनी यासाठी लॉबींग सुरू केली आहे. तर यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे एकनाथराव खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी काही नगरसेवकांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या कार्यपध्दतीबाबत उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती देखील समोर आली आहे.

Protected Content