कोरोना ; आरोग्य विम्याचे दावे वाढले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांवर पोहोचली आहे. उपचारांसाठी आरोग्य विम्याच्या दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आरोग्य विमा कंपन्यांकडे जून महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये आरोग्य विम्यांची संख्या २४० टक्क्यांनी वाढली आहे.

विमा कंपन्यांची शिखर संस्था जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या आकडेवारीनुसार जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ७१,४२३ ग्राहकांनी कोरोनाच्या उपचारासाठी ११४५.८७ कोटी रुपयांचे दावे सादर केले होते. तत्पूर्वी, २२ जूनपर्यंत केवळ २०,९६५ ग्राहकांनी करोनाच्या इलाजासाठी ३२३ कोटी रुपयांचे दावे केले होते. आरोग्य विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली, तरी देशातील विमाधारकांचे प्रमाण अद्याप मर्यादित आहे. देशामध्ये एकूण करोनाबाधितांपैकी केवळ ४.०८ टक्के बाधितांनीच आरोग्य विम्यासाठी दावा केला आहे. प्रति व्यक्ती दावा १.६० लाख रुपयांचा आहे. देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी असणाऱ्या एलआयसीकडे आतापर्यंत केवळ ५६१ मृत्यूदावे आले असून, त्यांची एकूण रक्कम २६.७४ कोटी रुपये आहे. एकूण ७१,४२३ दाव्यांमध्ये आयुष्मान भारत योजनेशी संबंधित दाव्यांचे प्रमाण मोठे आहे.

Protected Content