धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सतत होणाऱ्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासह पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी, या मागणीसाठी धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने मंगळवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. या संतत पावसामुळे शेतामध्ये पाणी साचून पीके पिवळी पडली आहे. तसेच पावसाची उघडीप न झाल्याने काही शेतांमध्ये गवताचे प्रमाण वाढल्यामुळे हाती आलेले पीक वाया जाणार आहे. तसेच कपाशी मका ज्वारी यासह मूंग, उडीद, सोयाबीन, तीळ यांचा फुलोरा गळतीमुळे पिके पिकांचे उत्पन्न कमी होणार आहे. यासह शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी, अशी मागणी केली आहे. लवकरात लवकर पिक विम्याची रक्कम व नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. याप्रसंगी धरणगाव शहराचे पदाधिकारी धनराज माळी, मोहन पाटील, रवींद्र पाटील, अरविंद देवरे, रंगराव सावंत, प्रा. एन डी पाटील, डॉ. नितीन पाटील, लक्ष्मण पाटील आधी उपस्थित होते.